-
About book : "मी नवोदय...!" हे पुस्तक माझ्या जवाहर नवोदय विद्यालयातील आठवणींचे भांडार आहे. घरापासून सहावी ते बारावी हा प्रवास केवळ शैक्षणिक प्रवास नसून तो बालवयाकडून तारुण्याकडे झुकलेला एक आगळावेगळा प्रवास होता. शिक्षणाबरोबरच शारीरिक, मानसिक, भावनिक जडणघडण होत असताना घडणाऱ्या गमतीदार अनुभवांची "साठवण" हाच ह्या पुस्तकाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे प्रत्येकाला हे पुस्तक वाचताना कुठेतरी स्वतःचे शालेय जीवन जगल्याचा विलक्षण आभास नक्की होईल, ह्याची मला खात्री आहे! एकंदरीत शाळेतील मौज, वसतिगृहातल्या उचापती, वर्गातील गमतीजमती, मित्रांमधील मायाळू ऋणानुबंध, बहरत जाणारी यारी-दोस्ती, शिक्षकांविषयी नितांत आदर, आई-वडिलांची असलेली ओढ, शाळा सोडताना भरून आलेले मन, इत्यादी सर्व गोष्टी ह्या पुस्तकाचा आत्मा आहेत. शेवटी खुमासदार व विनोदी शैलीत व्यक्त केलेल्या ह्या आठवणी वाचकाला "पुन्हा शाळेत घेऊन जातील!"- अशी आशा व्यक्त करतो.....!
About author : श्री. मनोज अशोक धनविजय हे जवाहर नवोदय विद्यालय, नवेगाव (खैरी), जि. नागपूर येथील माजी विद्यार्थी असून भौतिकशास्त्र विषयात एम. एस्सी आहेत. श्री. मनोज धनविजय, हे सध्या महाराष्ट्र शासन वनविभागात वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत असून अहमदनगर जिल्ह्यात सेवा देत आहेत. वनविभागात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी गृह मंत्रालय, (भारत सरकार) मध्ये देखील सेवा दिलेली आहे, तसेच बापूराव देशमुख इंजिनिअरिंग कॉलेज, सेवाग्राम येथे सहा. प्राध्यापक म्हणून काम केलेले आहे. श्री. धनविजय ह्यांना लेखनाबद्दल शालेय जीवनापासूनच विशेष ओढ आहे. नवोदय विद्यालयात असताना भारत सरकारने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत त्यांना राष्ट्रीय पारितोषिकही मिळालेले आहे. तसेच यापूर्वी त्यांचा एक कवितासंग्रह "योगिनी" प्रकाशित असून प्रभावी "ललित लेखन", हे त्यांच्या लेखनशैलीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सदर पुस्तकात श्री. धनविजय, ह्यांनी त्यांच्या जवाहर नवोदय विद्यालयातील निकोप व जीवभावाच्या शालेय गमतीजमती वाचकांसाठी खुल्या केलेल्या आहेत.