Kavyasangrah
About book : कविता म्हणजे... लेखणीच्या भावनांना... शब्दांच्या मार्मिक नांदण्याला.... कवी मनाच्या बोलण्याला... शब्दांच्या दरवळणाऱ्या सुगंधाला... तर कधी शाब्दिक विश्वाच्या शृंखलेला कविता म्हणतात.. कविता हा कवीच्या मनातील जणू काव्यसंघर्ष म्हणायचा. याच शाब्दिक एकांताच्या काठावर कवी मन विसावा घेते ते म्हणजे आत्मशोधासाठी, आत्मचिंतनासाठी तर कधी सामाजिक चित्र मनास जखडून टाकते तर कधी कल्पना विश्वातील गोष्टींचे शाब्दिक मर्म समाजासमोर प्रकटते. अशाच ठिकाणी शाब्दिक फुलपाखरे अनुभूतीच्या पुष्पातील माधुर्य चाखत असतात. याच कवी मनातील भावनांना शब्दरूप देताना उडणाऱ्या तुषारांची बनते ती कविता. ज्ञानेश्वरांच्या ओवी पासून ते तुकारामांच्या अभंगापर्यंत नाना रुपांनी नटलेल्या शब्दांच्या पुष्पमाला सामान्यांच्या मनाला मोहून टाकतात. कविता मनातील भावनांचा मुक्त प्रवाह असतात. शब्दांचे लयीत, चालीत आणि स्पंदनात गुंफलेले भावनीक मोत्याचे मनमोहक हार असतात. ‘काव्यांश’ म्हणजेच काव्य विश्वातल्या वाटचालीतील एक अंश आहे. भविष्यात हा अवर्णनीय प्रवास अखंड उपभोगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अविरत सुरू राहील. हा संग्रह फक्त कवितांचा संच नाही, तर विचारांची, अनुभवांची आणि भावनांची एक सुंदर मांडणी आहे. माझा या शब्दमय प्रवासात कळत नकळत सहभागी असणाऱ्या सर्व वाटसरूंचे मनपूर्वक आभार. शब्दांच्या या दुनियेत तुम्हाला आपलेसे वाटेल आणि प्रत्येक काव्याक्षर मनाला स्पर्शून जाईल, हीच एकमेव अपेक्षा!
About author : नमस्कार रसिकहो, काव्य विश्वातल्या आजपर्यंतच्या प्रवासाला उजाळा देण्याच्या उद्देशाने माझ्या प्रथम काव्यसंग्रह प्रकाशनाचा श्री गणेशा होतो आहे.जीवनात आलेली विलक्षण चढ-उतार ,अनुभव विश्वातील मनावर नकळत उमटलेल्या अविस्मरणीय रंगरेषांचे संदर्भ कुठे ना कुठे शब्दांमध्ये लपलेले आहेत. इयत्ता आठवी पासून शब्दांचा लळा लागला आणि शब्द गुंफण्याची आवड निर्माण झाली. त्यातूनच 'लेखणी' एक बहुरंगी शस्त्र बनले. अभ्यासक्रमातील प्राथमिक वर्गापासून शिकत असलेला मराठी विषय हा माझ्या आवडीचा असायचा. सर्व मराठी शिक्षकांच्या शिकवण्याच्या शैलीतून मराठी दृढ झाली. माध्यमिक वर्गात शिकत असता मराठीशी नाते घट्ट बांधले गेले आणि अचानक लेखणी हाताशी खेळू लागली व शाब्दिक गीत गाऊ लागली. इयत्ता बारावी नंतर कवयित्री अंजली गुंजोटे यांच्या सानिध्यातुन शब्द रजनी साहित्य समूहाशी जोडलो गेलो आणि तेथून काव्य प्रकारांची ओळख झाली. समूह संस्थापिका, कवयित्री अनिता अबनावे यांच्या मार्गदर्शनातून लेखणीला बळ आले आणि काव्य विश्वाला उत्तेजना मिळाली. नंतर सावली समूहाची जोडलो गेलो त्यातूनच कविवर्य सचिन पाटील सरांच्या सहवासातून शब्दसंग्रहात भर पडली आणि सावलीत हळूहळू वाढू लागलो. आज अत्यंत आनंद वाटतो की, शिक्षणासोबतच आवडता छंद जोपासण्याची संधी मिळाली आणि त्यातूनच शब्द गुंफण्याचा लळा लागला. आज पर्यंतच्या विविध विषयांवर लिहिलेल्या कवितांचा संग्रह तुम्हा रसिकांपर्यंत पोहोचतोय, यात फार आनंद होतो आहे. प्रेरणास्त्रोत कै. माधव स्वामी (आजोबा) यांना साष्टांग दंडवत आणि शिंपल्यातल्या मोती सामान जपणाऱ्या माझे सर्वस्व, पूजनीय मातापित्यांचे खूप खूप आभार आणि साष्टांग प्रणाम. सर्व साहित्यिक, शिक्षकवर्ग व मित्रपरिवार सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपलाच, चि. सोमेश्वर सिद्धेश्वर स्वामी